Tuesday, 26 October 2010

स्वतंत्र भारतास अनावृत्त पत्र

आ. विवेक पंडित, वसई -
pvivek2308@gmail.com


माझ्या प्राणाहूनही प्रिय स्वतंत्र भारता,


आज अनेक वर्षांनी तुला पत्र लिहायला बसलोय. तसं तर गेली ३० वर्षे तू भेटतोच आहेस मला. कधी कुण्या दीन-दुबळ्यांच्या अश्रुतून, कधी भूकबळींच्या वेदनेतून, तर कधी उपेक्षितांच्या दुर्लक्षिलेल्या जाणीवेतून. तुला माहितीय की, मी गेली ३० वर्षे लढतोय या तू आम्हा भारतीयांना देऊ केलेल्या लोकशाही मूल्यांसाठी, तू निर्मिलेल्या आणि जगभरात आदर्श ठरलेल्या तुझ्या संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांसाठी..तुला चांगलं माहितीय की, मी अनेकदा रस्त्यावर उतरलोय, त्या साऱ्यांसाठी ज्यांच्या उंबरठय़ापर्यंत तुझे स्वातंत्र्य ६३ वर्षांनीही अद्याप पोहोचलेले नाही. हे स्वतंत्र भारता, तू ६३ वर्षांपूर्वी देऊ केलेल्या व्यवस्थेशी मी गेली ३० वर्षे लढतोय हे पाहून तुझ्या मनात काय भावना दाटून आल्या असतील मला ठाऊक नाहीत. कदाचित तुला माझा राग येत असेल वा कौतुकही वाटत असेल किंवा तू हसतही असशील उपहासाने ..पण मला त्याची फिकीर नाही आणि तुझ्या स्वातंत्र्याने मला तसा विचार करीत थांबण्याची मुभाही दिलेली नाही. तुझ्याशी लढलेल्या अनेक लढाया मी आजवर जिंकलो. अनेक संघर्षांत कुणा उपेक्षिताला न्याय मिळवूनही देऊ शकलो. अनेकदा तू मला हरवलंस, नेस्तनाबूत केलेस, पण तरीही मी पुन्हा नव्याने शस्त्र पाजवून पुढच्या लढय़ाची तयारी तितक्याच उमेदीने केली. अनेकदा माझा पराभव केल्यावर तू खूषही झाला असशील मनोमन.. पण अरे वेडय़ा, तो पराभव माझा नव्हताच मुळी.. रणभूमीत जखमी अवस्थेत पडलेला, विव्हळणारा माझा देह म्हणजे तू देऊ केलेल्या स्वातंत्र्याची लक्तरं होती. धारातीर्थी तर तू पडला होतास. माझं काय? मी लढायलाच जन्माला आलोय. संघर्ष हा माझा श्वास आहे. गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्ग ही माझी पाऊलवाट आहे. त्यामुळे जरी एखाद्या लढाईत तू मला जायबंदी केलंस तरी नवी रणभूमी आणि नव्या रणभूमीवरचा नव्या शस्त्रांनी केलेला नवा संघर्ष, हेच माझे जणू आयुष्य झालेय आता.आज बऱ्याच काळाने मनात दाटून आले आणि वाटलं तुझ्याशी थेट संवाद साधावा. हे स्वतंत्र भारता, तू कसा आहेस?, हा प्रश्न विचारण्याचे धाडस मी करणार नाही. कारण तू कसा आहेस याचा पाढा वाचायला घेतलास तर भूकबळी, लोकशाहीच्या सगळ्या स्तंभामध्ये, सर्व स्तरांमध्ये झिरपत गेलेला भ्रष्टाचार, संवेदनाशून्य प्रशासकीय यंत्रणा, शासनाची अनास्था, दारिद्रय़, बेरोजगारी, अराजकता, कमालीची निरक्षरता, दीन-दुबळ्यांच्या आत्महत्या, उपेक्षितांचे शोषण इत्यादी भयावह वास्तवतेला मला आणि तुला दोघांनाही सामोरं जावं लागेल आणि मग गेली ३० वर्षे समाजातल्या वेगवेगळ्या प्रतलांवर एकमेकांशी लढणारे आपण दोघेही मग वेदनेने एकमेकांच्या गळ्यात पडून धाय मोकलून केवळ रडत राहू. दोस्ता, आज इतक्या वर्षांनी तुला मी पत्र लिहायला बसलो. कारण, आज जेव्हा मी शैलेश रमाकांत सुरुंदाच्या घरी गेलो तेव्हा मला तुझी प्रकर्षांने आठवण झाली. तुला माहिती आहे, शैलेश रमाकांत सुरुंदा, वय वर्षे १७, एक हुशार पण गरीब आदिवासी मुलगा, आई-वडील शेतमजुरी करणारे, डोळ्यांमध्ये कसलेच भविष्य नसणारे त्याचे आई-बाप. मात्र त्या मुलाच्या डोळ्यात मात्र उज्ज्वल भविष्याची स्वप्नं तरळत होती. चांगले आयुष्य जगायचे होते. त्यासाठी स्वतंत्र भारता, तूच या आदिवासींना कायदे बनवून काही सुविधा, शिष्यवृत्तीसारख्या काही सवलती दिल्या होत्यास. शैलेशची आर्थिक स्थिती हलाखीची होती.


पण पोरगं कमालीचं हुशार आणि मेहनती होतं. शैक्षणिक फी माफीसाठी त्याला जातीच्या दाखल्याची गरज होती आणि प्रशासनाला नोटांवरच्या गांधीजींची भूक होती. ती भूक तो गरीब मुलगा शमवू शकला नाही. या भ्रष्ट, कोडग्या व्यवस्थेच्या गतीने धावायला शैलेश पांगळा होता. त्याला जातीचा दाखला जो त्याचा तू देऊ केलेला हक्क होता तो त्याला अखेर मिळालाच नाही. शिक्षणाला मुकावे लागेल या निराशेपोटी शेवटी त्याने गळफास लावून स्वत:ला संपवले. आदिवासीच्या कल्याणासाठी तू केलेल्या तमाम कल्याणकारी योजना, सवलती फक्त कागदावरच राहिल्या. माझ्या स्वतंत्र भारता, का रे वेडय़ा, उगा भलतीच स्वप्नं दाखवलीस माझ्या गरीब आदिवासी बांधवांना? आणि जर स्वप्नं दाखवलीस तर तू देऊ केलेल्या लोकशाही यंत्रणांच्या आजच्या जाणीवाहीन, पाशवी भ्रष्टतेखाली त्याची स्वप्नं अशी चिरडू का दिलीस? माझ्या दोस्ता, मी केवळ तुलाच दोषी मानीत नाही. मीही तितकाच दोषी आहे. आतापर्यंतच्या आपल्यातल्या लढायांमध्ये कधी तू जिंकलास तर कधी मी जिंकलो. पण आजचा पराभव हा आपल्या दोघांचा पराभव आहे. कारण तू लोकशाही शासन व्यवस्था आम्हाला देऊ केलीस आणि मी एक विधिमंडळ सदस्य या नात्याने त्या लोकशाही शासन व्यवस्थेतलाच एक भाग आहे. ठाणे जिल्ह्यातल्या ज्या भागात ती दुर्दैवी घटना घडली, त्या मतदारसंघातून मला जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेय. त्यामुळे शैलेशच्या आत्महत्येच्या पापाचा धनी जितका तू आहेस तितका मीही आहे. हे स्वतंत्र भारता, त्यामुळे गेल्या ३० वर्षांच्या आपल्या संघर्षांत माझा पराभव झाला की तू माझं सांत्वन करायचास तर तुझा पराभव झाला की मी तुझे सांत्वन करायचे. पण आज शैलेशच्या आत्महत्येबाबत आपल्या दोघांपैकी कुणी कुणाचं सांत्वन करायचं हा एक प्रश्नच आहे. तुला माहितीच आहे दोस्ता, शिक्षणाची आस पूर्ण होणार नाही या नैराश्येपोटी शैलेशने त्याच्या घराच्या ज्या आडय़ावर गळफास लावला होता.



त्या अड्डय़ावर शैलेशच्या स्वप्नांचे कलेवर नव्हते तर तुझं आणि माझं, आपल्या दोघांचंही कलेवर त्यावर लटकत होतं. काही दिवसांपूर्वी जव्हारच्या सिताराम पांडवा या ३२ वर्षांच्या आदिवासी युवकाने दारिद्रय़ापोटी आत्महत्या केली. तेव्हाही मला तुझी तीव्रतेने आठवण झाली होती. हे स्वतंत्र भारता, माझ्या मित्रा, आणखी किती दिवस लागतील रे, आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हायला? आयुष्यभर ज्या महात्म्याला मी माझा आदर्श मानले त्या माझ्या गुरुस्थानी असलेल्या साने गुरुजींनी स्वतंत्र भारतात आत्मत्याग का केला असेल, याची कारणं जेव्हा मी शोधतो तेव्हा त्या शोधाच्या प्रक्रियेत हाती येणाऱ्या वास्तवाने मी पुरता होरपळून जातो रे आतल्या आत..हे स्वतंत्र भारता, तू १५ ऑगस्ट १९४७ ला जे स्वातंत्र्य आम्हाला देऊ केलेस ते खरंच खूप सुंदर, पवित्र, आशादायी अन् सोनेरी असेलही. पण गेल्या ३० वर्षांत समाज अगदी जवळून पाहताना त्यात समरसून जगताना मला स्वातंत्र्याचं बकाल, छिन्नविच्छिन्न झालेलं रुपच दुर्दैवाने अनुभवास आलं. तू देऊ केलेलं ते शुद्ध, निखळ स्वातंत्र्य समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत झिरपलंच नसावं कदाचित. ज्या उंबऱ्यातल्या उपेक्षितांसाठी मी लढलो. कदाचित स्वातंत्र्याची ही प्रकाश किरणे त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या तगमगीतच साने गुरुजींसारखे अनेक सूर्य स्वत:हून मावळले असतीलही, माहीत नाही. हे स्वतंत्र भारता, अजून खूप लिहायचं, बोलायचं आहे. यापुढेही आपण एकमेकांशी संवाद साधू. पण अशा कुणा शैलेश वा सितारामाच्या आत्महत्येच्या निमित्ताने नको. कारण खरं तर ही आत्महत्या कुणा युवकाची, त्याच्या स्वप्नांची आत्महत्या नाहीच मुळी. ही आत्महत्या आहे तू निर्मिलेल्या लोकशाही व्यवस्थेची. ही तुझी नि माझी आत्महत्या आहे रे. पुन्हा केवळ आपली भेट एकवेळ पूर्वीसारखी रणांगणात झाली तरी चालेल. मी तुझ्याशी लढण्यासाठी पुन्हा माझी शस्त्रं उमेदीने पाजवेन. पण पुन्हा आपली भेट अशी कुणा उपेक्षित, शैलेश वा सितारामच्या गळफासावर न होवो या आशेसह हा पत्र प्रपंच इथेच थांबवतो.